सोलापूर : गोकुळ शुगरच्या थकीत बिलप्रश्नी २०० शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर या खासगी साखर कारखान्याने चालू हंगामात गाळप परवाना नसतानाही सुमारे साडेतीन लाख टन ऊस गाळप केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहेत. मात्र, शेतकऱ्यांना एक रुपयांचेही ऊस बिल देण्यात आलेले नाही. हजारो शेतकऱ्यांची तब्बल १३० कोटी रुपयांची रक्कम थकवून गोकुळ शुगर कारखाना चालवणारा मोकळा फिरत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. गोकुळ शुगरने थकीत ऊस बिले द्यावीत, या मागीसाठी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत आहेत. दरम्यान, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. बुधवारी कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

तब्बल २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी शेती, संसार आणि घराचा उंबरठा सोडून शहरात रस्त्यावर रात्र काढली. ना अंथरूण, ना पांघरूण, ना सुविधा. त्यातच पोलिसांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे मंगळवारी आंदोलन चिघळले आणि संतप्त शेतकरी थेट मुख्य रस्त्यावर येऊन बसले. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. कडक उन्हामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मंडप उभारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सदर बझार पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे आणि उपनिरीक्षक गजानन पाटील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर वातावरण तणावपूर्ण बनले. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वार सोडून रंगभवन ते विजापूर वेस या मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळित झाली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here