सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना आणि दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया (डीएसटीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऊस उत्पादकता वाढ अभियान’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम, तर प्रमुख पाहुणे म्हणून दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष सोहन शिरगावकर उपस्थित होते.
सोहन शिरगावकर यांनी साखर उद्योगासमोरील सध्याच्या आव्हानांचा आढावा घेत ऊस उत्पादकता वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. प्रमुख वक्ते डॉ. अरुण मराठे यांनी मृदाशास्त्र विषयावर मार्गदर्शन केले. कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी ऊस उत्पादन वाढीसाठीचे सोपे तंत्रज्ञान समजावून सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एफ. कदम यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष तानाजी शिंदे, शेती कमिटीचे अध्यक्ष रघुनाथराव कदम, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यक्षेत्रातील सभासद उपस्थित होते.


















