छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात खरीपासाठी मक्याला प्राधान्य; अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर : आगामी खरीप हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मक्याच्या लागवडीला मोठे प्राधान्य देण्यात आले असून, तब्बल २ लाख ६५ हजार ६३० हेक्टर क्षेत्रावर मका पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीही शेतकऱ्यांनी कपाशीखालील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र कमी करून मक्याकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे आणि प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा सादर केला.त्यानुसार जिल्ह्यात एकूण ३ लाख ४५ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कपाशी ३ लाख ८ हजार ४५४ हेक्टर, तूर ५४ हजार ८०३ हेक्टर, सोयाबीन ३४ हजार २१७ हेक्टर, मुग १२ हजार १६७ हेक्टर, बाजरी ९ हजार ६८ हेक्टर, भुईमूग ८ हजार १९९ हेक्टर आणि उडीद ३ हजार ८६६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

जिल्ह्यातील पिकनिहाय पेरणीसाठी एकूण ५१ हजार ७२५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये मक्यासाठी ३९ हजार ८४५ क्विंटल, तुरीसाठी २ हजार ८७७ क्विंटल, तर सोयाबीनसाठी २५ हजार ७३८ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. कपाशीसाठी ७ हजार ७११ क्विंटल, म्हणजेच सुमारे १७ लाख १३ हजार बियाण्यांची पाकिटे लागणार आहेत. महाबीज, एनएससी आणि खासगी पुरवठादारांकडून बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खतांच्या बाबतीत २०२६ साठी जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ७४९ टन खतांची मागणी नोंदवली आहे. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके आणि एसएसपी खतांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत २ लाख ९२ हजार ७०० टन खतांचे वाटप मंजूर झाले असून आवश्यकतेनुसार पुरवठा केला जाणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ अखेर जिल्ह्यात १ लाख २३ हजार ९२८ टन खतसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here