सांगली : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना आणि ‘दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे ‘ऊस उत्पादकता वाढ अभियान’ अंतर्गत शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. विश्वास कारखान्याचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर ‘दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया’चे अध्यक्ष सोहम शिरगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. अरुण मराठे यांनी मृदाशास्त्र आणि जमिनीची सुपीकता याविषयी मार्गदर्शन केले. कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी ऊस उत्पादन वाढीसाठीचे सोपे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडले.
संचालक विराज नाईक म्हणाले की, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या विविध ऊस विकास योजना राबवल्या जात आहेत. वाढत्या रासायनिक खतांच्या किमती आणि इंधनाच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना ऊस शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कारखान्याच्या माध्यमातून थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. तर डेक्कन शुगरचे अध्यक्ष सोहम शिरगावकर यांनी वाढत्या गाळप क्षमतेनुसार ऊस उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. मेळाव्यास ‘विश्वास’चे संचालक सुरेश पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच पांडुरंग कुंभार, जयसिंग पाटील, शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. संचालक दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.


















