सातारा : सध्या राज्यात सर्वच बाबतीत य.मो कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. चांगल्या चाललेल्या कारखान्यात पुर्वी सारखे विचित्र घडायला नको. शेतकरी, सभासद, कामगार तसेच ट्रॅक्टर वाहनधारकांना न घेतलेल्या पैशाचा भुर्दंड सोसायला लागू नये. याचा सारासार विचार करून आज सहकार तसेच राजकारणातील अनेकजण आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. निवडणूक आली की, बिबे, सुवा, लिंबू, भंडाऱ्याचा खेळ सुरू होतो. परंतु मच्छिंद्रनाथांच्या मातीत याचा फरक पडणार नाही. ज्यांच्या कालवधीत नावलौकिक प्राप्त अशा कृष्णा कारखान्याची सहकार क्षेत्रात तसेच राज्यात बदनामी झाली अशा लोकांनी आमच्या नादी लागू नये, असा इशारा आ. डॉ. अतुलवाबा भोसले यांनी नाव न घेता विरोधकांना दिला आहे.
वडगाव हवेली ता. कराड येथे य. मो. कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, व्हा. चेअरमन जगदिश जगताप, धोंडीराम जाधव, वसंतराव शिंदे, बाजीराव निकम, जि.प. सदस्या सौ. प्रियांका साळुंखे, पं.स.सदस्या सौ. वर्षा निकम यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी सरपंच सत्यवान जगताप होते.
डॉ. सुरशे भोसले म्हणाले, विरोधकांच्या हाती कारखाना गेल्यानंतर कशी अवस्था होते हे सर्वांनी पाहिले आहे. कारखान्याचे आधुनिकरण केले, नवनविन बदल, प्रयोग करताना सभासद, शेतकरी, कामगारांचे कसलेही नुकसान केले नाही. उलट जास्तीच्या सवलती देवू केल्या. सहकार क्षेत्रात सर्वच बाबतीत कृष्णा अव्वलस्थानी आहे. विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत. अशी परिस्थिती असून कारखान्याचा कारभार पाहून अनेकजण आमच्या गटात सामिल होत आहेत. याचे समाधान असून दिलेला शब्द आणिचांगल्या कामाला पाठींबा आम्ही देतच आलो आहोत. विरोधक वारेमाफ आश्वासन देत आहेत. मग त्यांच्या काळात का झाले नाही असा सवाल करत डॉ. भोसले यांनी काहीतरी मिळेल या अपेक्षाने विरोधकांकडून निवडणूक लढवली जात आहे. यापेक्षा दुसरा कसलाच त्यांचा हेतू किंवा अजेंडा नाही. सभेस शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















