कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) व कृषी विज्ञान केंद्र (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने करनूर (ता. कागल) येथे आयोजित केलेल्या ‘ऊस शेतीतील ए.आय. तंत्रज्ञान’ कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे झालेल्या ऊस वाढीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत शिवारफेरी केली. त्यांनी ए.आय. तंत्रज्ञानाद्वारे वाढविलेल्या उसाची पाहणी केली.
यावेळी झालेल्या ऊस पीक परिसंवादास ५०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तुषार जाधव यांनी मृदा परीक्षण, पाणी व्यवस्थापन व पीक फेरपालट यांचे महत्त्व विशद केले. तर भारती ग्रीनटेकचे विनायक पोळ यांनी जीवामृत व जैविक खतांच्या वापरामुळे उत्पादनवाढीस मदत होत असल्याचे सांगितले.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीळ यांनी ए.आय. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे सांगत मुश्रीफ यांनी राज्य शासन, साखर कारखाने व जिल्हा बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘सध्या जिल्ह्यातील सरासरी ऊस उत्पादन एकरी २४ टनांपर्यंत घसरले असून, ही चिंतेची बाब आहे. एआयचा अवलंब केल्यास उत्पादन एकरी ६० टनांहून अधिक वाढविणे शक्य होईल. त्यामुळे साखर उद्योगाला स्थैर्य मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. या कार्यक्रमास साखर कारखान्यांचे पदाधिकारी, बँक अधिकारी, कृषितज्ज्ञ व शेतकरी उपस्थित होते.


















