सांगली : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याविरोधात ४३ दिवसांपासून वाळवा येथे ठिय्या आंदोलन सुरू असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या सुरू असलेल्या हालचाली थांबणार आहेत. वैभव नायकवडी यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा आणि हुतात्मा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावा, साखर कारखान्याच्या कर्ज भरण्याची व्यवस्था करावी, या मुख्य मागण्यांच्यासाठी ज्येष्ठ नेते किरण नायकवडी, संचालक गौरव नायकवडी व केदार नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४३ दिवसांपासून वाळवा येथे ठिय्या आंदोलन सुरू होते. अखेर वैभव नायकवडी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैभव नायकवडी यांनी दिलेला राजीनामा सी. बी. पाटील व आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांपुढे वाचून दाखवला. यावेळी आंदोलकांनी राजीनामा देण्यासाठी भरपूर कालावधी घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
हुतात्मा संकुलाला कसलेही गालबोट लागू नये म्हणून राजीनामा दिला : वैभव नायकवडी
राज्यभर आदर्श असलेल्या हुतात्मा संकुलाला कसलेही गालबोट लागू नये, हुतात्मा संकुलातील सर्वसंस्था चांगल्या चालाव्यात यासाठीच मी हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी दिली. ते पुढे म्हणाले, ‘शुक्रवारी (ता. २८) आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोमवारी द्यायचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे आज कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या उद्योगावरती अवलंबून असणारे शेतकरी, कामगारांच्या आर्थिक प्रगतीसाठी भविष्यातसुद्धा मी कार्यरत राहणार आहे. आंदोलन थांबावे यासाठी पहिल्यापासूनच माझा आग्रह होता. त्यासाठी पुढे मागे होण्याचीसुद्धा माझी तयारी होती. हा व्यवस्थित उद्योग चालावा, कुटुंबावर वाईट परिणाम होऊ नये, अशा सर्वच बाबींचा विचार करून मी राजीनामा देत आहे


















