नांदेड : थकीत ऊस बिलप्रश्नी गोदाकाठ कारखान्यासमोर आंदोलनानंतर मिळाला पाच कोटींचा धनादेश

नांदेड : उस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून गोदाकाठ ऑरगॅनिक साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. या आंदोलनाची तातडीने दखल घेत महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी मध्यस्थी करत आंदोलक शेतकरी व कारखाना प्रशासनामध्ये चर्चा घडवून आणली. चर्चेदरम्यान प्रशासनाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी येत्या १० जूनपर्यंत मुदत देण्यात यावी, अशी लेखी विनंती केली. गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे व तोड वाहतूकदारांचे थकीत बिल अदा करण्याची हमी म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेश अनामत स्वरूपात शेतकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

कारखान्याला कासापुरी सर्कलसह परिसरातील उस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला होता. मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यांतील गाळपाचे बिल अद्यापही मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन थकीत रक्कम तत्काळ अदा न झाल्यास कारखान्याच्या गेटसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सोमवारी ऊस उत्पादक शेतकरी कारखाना परिसरात एकत्र आले. आंदोलनाची माहिती मिळताच महसूल विभाग व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही घटकांची चर्चा घडवून आणली. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी सद्यःस्थितीत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. थकीत ऊस बिले वेळेत मिळावीत, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा प्रशासनासमोर मांडली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here