चंदीगड : पंजाब राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी विविध पिकांकरिता सहकारी कर्ज मर्यादेत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी केली. गव्हासाठी कर्ज मर्यादा प्रति एकर २४,३०० रुपयांवरून ३०,००० रुपये प्रति एकर करण्यात आली आहे. तर उसासाठीची कर्ज मर्यादा प्रति एकर ४४,००० वरून प्रति एकर १,००,००० पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारकांसाठी धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून ते शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरेल, असेही मान म्हणाले. राज्यात पहिल्यांदाच पीक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी प्रति एकर २,००० रुपयांचे कर्ज दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.
राज्याील सहकारी बँकांची आर्थिक स्थितीही सुधारली जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पंजाबमधील सहकारी बँका ७ टक्के व्याजदराने कर्ज देतात, जो सर्वात कमी आहे असे सांगितले. शेतकऱ्यांसाठीच्या कर्ज सुविधेची माहिती देताना मान यांनी सांगितले की, केसीसी योजनेअंतर्गत नवीन पिकांचा समावेश करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत राज्यात पीक विविधतेला प्रोत्साहन देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाईल. ड्रॅगन फ्रूटसाठी प्रति एकर ४७,००० रुपयांचे कर्ज दिले जाईल. मत्स्यव्यवसायासाठी कर्ज मर्यादा प्रति हेक्टर २.५० लाख रुपयांवरून ३ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि पांढऱ्या कोळंबीसाठी कर्ज मर्यादा प्रति हेक्टर ४.५० लाख रुपयांवरून ५.५० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पॉपलर लागवडीसाठी प्रति एकर २,०००, बांबूसाठी प्रति एकर १३,०००, ‘जामुन’साठी प्रति एकर २३,०००, लेमनग्राससाठी प्रति एकर ३०,०००, लसणासाठी प्रति एकर १.५७ लाख, रबी कांद्याच्या पिकासाठी प्रति एकर ९२,६८६ आणि संकरित टोमॅटोसाठी प्रति एकर ८०,९८१ कर्ज दिले जाईल. तर ड्रॅगन फ्रूटसाठी ४७,००० रुपये कर्ज मिळेल.


















