कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात हरोली परिसरात पाणीटंचाईचा ऊस पिकाला फटका, शेकडो हेक्टर क्षेत्र धोक्यात

शिरढोण : हरोली (ता. शिरोळ) गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पंचगंगा नदी काठावर असूनही सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रातील ऊस पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीस्रोतांमधून अल्प प्रमाणात शेतीसाठी पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. वाढत्या खर्चामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतीला दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

गावाचे ऊस हे प्रमुख पीक असून बहुतांश शेतकरी त्यावर अवलंबून आहेत. एकूण शेती क्षेत्र ४७१ हेक्टर असून त्यापैकी ४४२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. मात्र, सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. अनेक शेतातील ऊस पिवळसर पडून वाळू लागला आहे. गावातील विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत शेतकरी लक्ष्मण माने यांनी सांगितले की, गावातील विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी सातत्याने घटत असल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तातडीने प्रभावी उपाययोजना केल्यास शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांना दिलासा मिळू शकतो.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here