पांगरी : पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलांप्रश्नी शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी दिलेल्या आंदोलनानंतर लगेच पैसे देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, त्याचे पालन न झाल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याविरोधात दुसऱ्यांदा टाळे ठोको आंदोलन सुरू केले आहे. कारखाना प्रशासन फक्त आश्वासन देत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. पेरणी तोंडावर आली, अद्याप आमच्या हक्काचे पैसे कारखाना प्रशासन देत नाही असं शेतकऱ्यांनी सांगितले. जोपर्यंत कारखाना प्रशासनाकडून पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा निर्धार यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला.
शेतकऱ्यांनी सांगितले की, कारखान्याचा कारभार ढिसाळ पद्धतीने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी, मार्च महिन्यात ऊस पाठवला. यंदा आधीच ऊस पुरवठा करताना तो नेण्यासाठी कारखान्याने उशीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागले. आता पैशासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाने जुलै, ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे देऊ असे आश्वासन दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे यासाठी पैसे नाहीत. या परिस्थितीला सरकारसुद्धा जबाबदार आहे. साखर सम्राटांच्या हाती असलेल्या या कारखान्यांवर सरकारचा वचक नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. सरकारने संबंधीतांवर कठोर कारवाई करून ऊस बिले तातडीने देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असे शेतकऱ्यांनी सांगितले.


















