करमाळा : मांगी (ता. करमाळा) येथील शेतकऱ्याची ऊस तोडणीसाठी मजूर देण्याचे आमिष दाखवून साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वैभव लालासाहेब बागल (रा. मांगी, ता. करमाळा) यांनी २ जून २०२६ रोजी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, नामदेव मोहन कासार व विनोद आप्पाजी पवार (दोघेही रा. बेलोरा, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील दोघा संशयितांनी ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित नामदेव मोहन कासार व विनोद आप्पाजी पवार यांनी वैभव बागव यांना ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत ६ लाख ४९ हजार ६७२ रुपये घेतले. मात्र, संबंधितांनी ठरल्याप्रमाणे मजूर उपलब्ध करून दिले नाहीत. घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे बागल यांनी आपली आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. करमाळा पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस नाईक अश्पाक शेख तपास करीत आहेत.


















