हिंगोली : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (आरबीएसके) आरोग्य पथकाने शेवाळा व देवजना (ता. कळमनुरी) परिसरातील गुऱ्हाळघरे आणि उसाच्या फडात ऊसतोडीसाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील धनज येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांची आरोग्य तपासणी केली. पथकातील डॉ. लक्ष्मण गाभणे, डॉ. शिवाजी माने, डॉ. अमोल भालेराव, डॉ. पूजा जगताप, एम. बी. दांडेगावकर व अमोल डुकरे यांनी शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची कसून आरोग्य तपासणी केली. यामध्ये बालकांमधील जन्मजात दोष, दिव्यांगत्व, रक्तदाब, मधुमेह व इतर आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांचीही आरोग्य तपासणी झाली.
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र गजभिये, डॉ. रवींद्र पुरी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष अभियान राबविण्यात आले. ऊस सोडणीसाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह यवतमाळ भागातून शेकडो मजूर सहकुटुंब दाखल झाले आहेत. येथील शेतकरी चंद्रकांत सूर्यवंशी व स्वरूप सूर्यवंशी यांच्या उसाच्या फडात कामासाठी आलेल्या मजुरांच्या मुलांची तपासणी करण्यात आली. मजुरांना मुलांना सकस पोषण आहार देणे आणि पाणी उकळून पिण्याबाबत डॉ. शिवाजी माने यांनी मार्गदर्शन केले. तपासणीसाठी बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व शेवाळा उपकेंद्रात मोफत सुविधा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेवाळा उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी अर्चना माने, आरोग्य सेविका एस. बी. नरवाडे व आरोग्य सेवक किरण सूर्यवंशी यांच्यामार्फत दररोज मोफत लसीकरण सुरू असते याची माहिती देण्यात आली.


















