सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधी गटाने घेतली होती. मात्र निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानतर दिसलेल्या चित्रामुळे विरोधी पॅनलची ताकद अपेक्षेपेक्षा कमी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कारखान्याच्या २१ संचालकपदांसाठी तब्बल ९४ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सत्ताधारी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून ८१ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर विरोधी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून केवळ १३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सोसायटी मतदारसंघासह काही ठिकाणी विरोधकांकडून अर्जच दाखल झालेला नाही. त्यामुळे या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सोसायटी मतदारसंघातून विरोधी गटाचा एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे माजी आमदार शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जाते. इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती मतदारसंघ आणि घोडेगाव गटामध्येही विरोधी अर्ज नाही. अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीतील खरी लढत कोणत्या मतदारसंघात रंगणार आणि कोणत्या जागा बिनविरोध होणार, हे स्पष्ट होईल. मात्र सध्यातरी आकडेवारीवरून सत्ताधारी गटाचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. दरम्यान, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरून भाजप आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. काही कार्यकर्त्यांच्या मते, उमेदवारी वाटपात समन्वयाचा अभाव राहिल्याने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात विरोधी गटाला यश आले नाही.


















