उत्तर सोलापूर : सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. याप्रश्नी आता प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात येत आहे. त्याची दखल घेतली गेली नाही तर संभाजी तलावात जलसमाधी घेतली जाईल असा इशरा शेतकऱ्यांनी दिला. थकीत ऊसबिलासाठी दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी जिल्हा परिषदेसमोर दहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र, या कालावधीत साखर कारखान्यांचे प्रतिनिधी अथवा प्रादेशिक साखर कार्यालयातील कोणताही अधिकारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी आला नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
याबाबत आंदोलक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अॅड. अमोल पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भर पावसात शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र, त्याची दखल घ्यावी असे कोणालाच वाटत नाही हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आधी पूनम गेटपासून प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे. यावेळी अंबादास नरे, बालाजी रजपूत, भीमाशंकर कबाडे, सचिन जवळे, सतीश बिराजदार, मोहन धुमाळ, कल्याण मिटकर, प्रभाकर कबाडे, महेश करपे, विनायक पाटील, रमेश नरुटे, महादेव करपे, सचिन सपकाळ, सुभाष बावकर, अंकुश जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi सोलापूर : गोकुळ शुगरच्या थकीत बिलप्रश्नी आंदोलन तीव्र, जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

















