पुणे : विघ्नहर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकांच्यावतीने हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बेल्हे : शेतकऱ्यांनी पकडलेले हुमणीचे भुंगेरे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयात जमा करावेत. संकलित भुंगेऱ्यांना २०० रुपये प्रति किलो दराने बाजारभाव दिला जात आहे. हुमणी नियंत्रणासाठी कारखान्याच्या वतीने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, शेतकरी बांधवांनी त्यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक विकास हरिभाऊ चव्हाण यांनी केले. यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात प्रकाश सापळा उभारून त्याचे प्रात्यक्षिक सादर करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तज्ज्ञ संचालक विकास चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, दरवर्षी पहिल्या पावसानंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे मोठ्या प्रमाणात जमिनीतून बाहेर पडतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात. हुमणीची अळी उसाच्या मुळ्या व भूमिगत कोंब कुरतडुन खाते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, ऊस वाळू लागतो आणि अनेक ठिकाणी लागवडीत रिकाम्या जागा निर्माण होतात. प्रादुर्भाव तीव्र झाल्यास उसाच्या फुटव्यांची संख्या कमी होऊन उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे प्रकाश सापळ्यांच्या साहाय्याने भुंगेऱ्यांचे संकलन केल्यास त्यांची संख्या कमी होऊन पुढील काळातील हुमणीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मोठी मदत होते. हा उपाय कमी खर्चिक, पर्यावरणपूरक आणि प्रभावी असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा अधिकाधिक अवलंब करावा, असे चव्हाण यांनी सांगितले. किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, असे ते म्हणाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here