सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर यंदा ऊस टंचाईचे आव्हान, उत्पादनवाढीचे सामूहिक प्रयत्न गरजेचे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे झालेल्या लागवडीसह जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टरवर ऊस आहे. त्यातील जवळपास ७० टक्के क्षेत्र खोडव्याचे आहे. मात्र, वीजपुरवठ्यातील अडचणी, नद्यांतून वेळेवर पाणी न सोडणे, वाढते तापमान, अवकाळी पावसाचा अभाव आणि मोसमी पावसाबाबतची अनिश्चितता यामुळे येत्या हंगामासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होईल का, याबाबत शंका व्यक्त होत आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यातील कारखान्यांनी एकूण १ कोटी ५९ लाख ७३ हजार ४९२ टन उसाचे गाळप केले असले तरी बहुतांश कारखान्यांचा हंगाम ९० ते १०५ दिवसांतच संपुष्टात आला. येत्या हंगामात अनेक कारखाने ६० दिवस तरी चालतील का, याबाबत कारखानदारांमध्येच साशंकता आहे. एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाऊस कमी झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

जिल्ह्यात सिंचनक्षेत्र वाढल्याने आणि ऊस लागवडीचा विस्तार झाल्याने साखर कारखान्यांची संख्या ३५ च्या पुढे गेली. अनेक कारखान्यांनी विस्तारीकरण करून गाळप क्षमताही वाढविली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एकत्रित प्रतिदिन गाळप क्षमता १ लाख ६६ हजार ८०० मेट्रिक टन इतकी आहे. मात्र, वाढत्या क्षमतेच्या तुलनेत ऊस उपलब्ध होत नसल्याने ही क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. उसाच्या उत्पादनात वाढ न झाल्याने कारखान्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. परिणामी, एकेकाळी १४० ते १८० दिवस चालणारे गाळप हंगाम आता ९० ते १०५ दिवसांपर्यंत आटोपत आहेत. आता त्यात घट येऊ शकते. याबाबत वटवटे येथील जयहिंद शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव म्हणाले की, आम्ही ऊस उत्पादन वाढीसाठी कटाक्षाने लक्ष ठेवले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील किमान २५ टक्के ऊसक्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पाचट व्यवस्थापन आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याशिवाय ऊस उत्पादन वाढविणे कठीण आहे. त्यासाठी उसाच्या नवीन वाणांचा प्रसार, नियमित बेणे बदल, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर, पाचट व्यवस्थापनाला प्रोत्साहन, एआय आधारित पीक नियोजन आणि निरीक्षण यावर भर द्यावा लागेल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here