मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वाखालील एका शिष्टमंडळाने नुकताच दिल्ली दौरा केला. या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. या दौऱ्याची सविस्तर माहिती मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांना दिली आहे, असे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी सांगितले. मात्र, या भेटीत कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कांद्याचा प्रश्न आणि साखर उद्योगासमोरील समस्याचे निर्णय १० दिवसांच्या आत घेतले जातील, असे आश्वासन दिले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, राज्यातील कांद्याच्या दराची स्थिती आणि आगामी गाळप हंगामात साखर उद्योगाला सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांवर या चर्चे चा मुख्य भर होता. मी शरद पवार यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेषतः कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर चर्चा केली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट पार पडली. पवार यांच्याशी झालेल्या त्यांच्या भेटीबाबत अनावश्यक तर्कवितर्क काढण्याचे कोणतेही कारण नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि आपण ज्या शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहोत, त्यांच्या कामकाजाशी संबंधित बाबींवर, तसेच शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.


















