पळसदेव : खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांतील पिके सुकू लागली आहेत. कालव्याच्या पाण्याअभावी उसासारखी नगदी पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचे सुमारे ७० कोटींचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनांचा धडाका सुरू केला आहे. या प्रश्नावर १८ मे रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलन केल्यानंतर ३ ते ५ जून यांदरम्यान पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात त्याचीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
पाण्याअभावी उसासारखे नगदी पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी झाल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. खडकवासला कालव्यातून पाणी मिळविण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. आधी पाण्यासाठी १८ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नंतर २५ मे रोजी सिंचन भवनासमोर आंदोलन झाले. यानंतर प्रशासनाने ३ जूनपासून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. आता करपलेल्या पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


















