कृष्णा-कोयना नदीतीरावरील शेतीपंप बंद ठेवण्याचे आदेश, सांगलीसह सातारा जिल्ह्यातील ऊस पिक धोक्यात

कऱ्हाड : कोयना धरणात सध्या केवळ सुमारे १०.३५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी धरण व्यवस्थापनाने काळजी घेतली आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांतील कृष्णा-कोयना नदीतीरावरील शेतीपंप बंद ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. कोयना धरणातून सध्या फक्त पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. शेतीसाठी नदीतून पाणी उचलण्यास बंदी घातली आहे. यंदा अपेक्षित उन्हाळी पाऊस न झाल्याने पिके वाळत आहेत. नदीकाठावर ऊस, मका, भाजीपाल्यासह नगदी पिके घेतली जातात. मात्र, तलाव, शेततळी, विहिरी कोडल्या पडल्याने पिकांचा पर्यायी पाणीसाठाही संपला आहे. साकुर्डी शिवारात तर पाण्याअभावी ऊस पिक वाळत आहे.

कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेती पंप सुरू केल्यास ते जप्त करण्याचाही दम शेतकऱ्यांना दिला आहे. सध्या तलाव, विहिरींतील पाणी आटल्याने पिके वाळून चालली आहेत. आता पाणी उपसा बंदीने पिके पूर्णतः वाळून जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उपलब्ध पाणी प्रथम पिण्यासाठी राखून ठेवण्यात आल्याने शेतीसाठी पाणी बंद झाले आहे. शेती वाचविण्यासाठी पर्यायी उपाययोजना, नियोजित पाणी वाटप किंवा तात्पुरती सवलत देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. याबाबत साकुर्डीतील शेतकरी संदीप साळुंखे म्हणाले की, खरे तर एप्रिल, मे महिन्यात कोयना नदी दुथडी भरून वाहत होती. त्यावेळी पाणी जादा न सोडता नियोजन करण्याची गरज होती. आता पाणीटंचाई भासत आहे, म्हणून शेतीच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा आहे. उपसा बंदीने पिके वाळण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here