यशवंतनगर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी सभासदांना मोफत व घरपोच साखर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निवडणुकीनंतर मिळणाऱ्या साखरेचे प्रमाण ८४ किलोवरून ६० किलोपर्यंत कमी करण्यात आले आहे. याशिवाय, घरपोच सुविधाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याशिवाय, सभासदांवर अन्याय करणारे काही निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सह्याद्री बचाव समितीने दिला आहे. याबाबत समितीच्यावतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सभासदांना सवलतीच्या दरात मिळणारी दिवाळी साखर पूर्ववत करावी, साखरेच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार वार्षिक घरपोच साखर द्यावी अशा तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
सद्याद्री बचाव समितीच्या निवेदनात म्हटले आहे की, कारखाना प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून कारखान्याकडे ऊस न घालणाऱ्या सभासदांची कार्डे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कारखान्याच्या विस्तारवाढीतील विलंब, ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, शेतकऱ्यांना होणारे आर्थिक नुकसान याबाबत काहीच केले जात नाही. निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या थकीत देणी व वेतनवाढीच्या फरकाबाबतही काहीच झालेले नाही. हे विषय प्रलंबित असताना सभासदांच्या हिताचे नसलेले निर्णय घेतले जात आहेत. हे निर्णय रद्द करावेत. सभासदांना विश्वासात न घेता निर्णय घेणे योग्य नसल्याचेही सह्याद्री बचाव समितीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अमोल पवार, संतोष वेताळ, लालासाहेब जगदाळे, नवनाथ पाटील, महेश चव्हाण, अजय थोरात, भरत चव्हाण, अनिल माने, विवेक चव्हाण, राजेंद्र जगदाळे, अनिल डुबल, विजय थोरात, राहुल थोरात, राजेंद्र शेलार, कृष्णत शेलार आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.


















