पुणे : शेतीसह विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. देशाचा आर्थिक कणा असलेल्या कृषी क्षेत्रात एआय मोठी कामगिरी बजावते आहे. सध्या तंत्राची पिके आणि एआयच्या मदतीने घेतली जाणारी पिके यातील फरक स्पष्ट दिसून येत आहे. दोन्ही तंत्रांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा लाभ होण्यासाठी व्हीएसआयच्या माध्यमातून आम्ही साखर कारखान्यांच्या सहभागाने प्रकल्प राबवतो आहोत. त्यात दहा हजार शेतकरी सहभागी झाले आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. पुण्यात शनिवारी झालेल्या ‘टेक्नॉलॉजी ऑन व्हिल्स’चा उपक्रमाच्या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार होते.
शरद पवार म्हणाले की, शेतीमधील उत्पादन व शेतीमालाची गुणवत्ता या दोन्ही आघाड्यांवर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान यशस्वी ठरलेले आहे. आता हे तंत्र कोणाचीही वाट पाहत नसून जलद गतीने पुढे निघाले आहे. या तंत्राचा विस्तार होण्यासाठी व्यवस्था तयार करायला हवी. समाजातील विविध घटकांना हे तंत्र शिकण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. यावेळी प्रतापराव पवार म्हणाले, एआय तंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये मिळायला हवेत असा आग्रह शरद पवार यांचा आहे. ते साध्य करण्यासाठी आता बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्ट झपाट्याने काम करतो आहे. एआय आधारित शेतीचा आमचा यशस्वी प्रकल्प देशाच्या विविध भागांमध्ये विस्तारतो आहे. अर्धा एकरची शेती असलेल्या छोट्या शेतकऱ्याला देखील हे तंत्र उपयुक्त ठरत असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे. भविष्यात एआयसाठी वापरला जाणारा डेटा (माहिती) महत्त्वाचा असेल. आम्ही मागील ५० वर्षांचा विश्वासार्ह डेटा वापरल्यानेच आमचा बारामतीमधील एआय शेतीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे.


















