कोल्हापूर : गडहिंग्लज साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन, चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे काम गतीने सुरू आहे. गेल्या हंगामातील उसासह, तोडणी-ओढणी यंत्रणेची संपूर्ण बिले दिली आहेत. आधुनिकीकरणातील समस्यांचे निराकरण करण्याचे काम तांत्रिक सल्लागारांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. कारखाना एक ऑक्टोबरपर्यंत गाळपासाठी सज्ज ठेवला जाईल. येत्या हंगामात चार लाख टन गाळपाचे, तर पाच लाख क्विंटल साखर उत्पादनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी दिली. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी पहिल्या मिल रोलरचे पूजन पताडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष पताडे यांनी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा बँकेच्या अर्थसाहाय्यातून कारखाना उर्जितावस्थेत आणण्यासाठी एकजुटीने संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू ठेवल्याची ग्वाही दिली. आम्ही निवृत्त व हंगामी कामगारांची देणीही नुकतीच दिली आहेत. भविष्यातही कामगार पगार, ऊस बिले, तोडणी-ओढणीची बिले, कंत्राटदारांची बिले, व्यापारी देणी देण्याचे नियोजन केले आहे असे ते म्हणाले. आगामी गळीत हंगामासाठी कारखाना वेळेत सुरू करण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्राधान्य देण्याचे आवाहन उपाध्यक्ष चव्हाण यांनी केले. गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामगार व बागायतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी केले. यावेळी संचालक सतीश पाटील, बाळासाहेब देसाई, अक्षय पाटील, अशोक मेंडुले, भरमू जाधव, विद्याधर गुरबे, विश्वनाथ स्वामी, काशिनाथ कांबळे, दिग्विजय कुराडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here