सातारा : श्रीराम कारखाना भागिदारीत सुरू ठेवण्यास दिलेली स्थगिती उठवण्याची कामगारांची मागणी

सातारा : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना सहयोगी तत्त्वावर चालवण्याचा पर्याय स्वीकारला. यासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर १८ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांची मंजुरी मिळवून प्रस्ताव साखर आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला शासनाने स्थगिती दिल्याचे वृत्त आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर कारखान्यातील सुमारे ६०० ते ७०० कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी, सभासदही हवालदिल झाले आहेत. कारखाना बंद राहिल्यास अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करत कामगारांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारखाना सुरू ठेवण्यास मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. कारखाना भागीदारी तत्त्वावर सुरू ठेवण्यास शासनाने दिलेली स्थगिती तातडीने उठवावी आणि आगामी गळीत हंगाम सुरळीत सुरू करण्यास परवानगी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कामगारांनी शासनाकडे निवेदन सादर केले आहे.

न्याय न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक अडचणीत असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याने सन २००४-०५ मध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याबरोबर भागीदारी करार केला होता. शासनाने कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मार्च २०२५ मध्ये पुढे ढकलली. नंतर प्रशासक नेमला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ही नेमणूक रद्द करत संचालक मंडळाला दैनंदिन कामकाज करण्याची मुभा दिली. दरम्यान, संचालक मंडळाने परिस्थितीचा आढावा घेऊन जवाहर कारखान्याने मार्च २०२६ मध्ये भागीदारी करार संपुष्टात आणला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्याचा कर्ज प्रस्ताव नाकारल्यानंतर सहयोगी तत्त्वावर कारखाना चालविण्याचा नवा प्रस्ताव केला. त्याला दिलेली स्थगिती उठवण्याची मागणी कामगारांकडून केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here