पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्षांची उद्या निवड, बारामती किंवा पुरंदर तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर गुरुवारी (दि. ११) नव्या उपाध्यक्षाची निवड संचालक मंडळाच्या बैठकीत होणार आहे. या पदावर कोणाला संधी मिळते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.रिक्त झालेल्या या पदासाठी इच्छुक संचालकांनी हालचाली वाढवल्या असून, उपाध्यक्षपदासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कारखाना परिसरात रंगत आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा असेल. त्या कोणाला संधी देतात, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. चार महिन्यांवर कारखाना निवडणूक येऊन ठेपल्याने नव्या उपाध्यक्षांना केवळ चारच महिने कामकाज पाहता येणार आहे. बारामती किंवा पुरंदर तालुक्याला ही संधी मिळण्याची शक्यता आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कारखान्याच्या निवड प्रक्रियेची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती आहे. त्यामुळे या निवडीला संघटनात्मक आणि राजकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात विस्तारलेल्या या अग्रेसर कारखान्यातील उपाध्यक्षपदाला विशेष महत्त्व राहिले आहे. मागील काळात आनंदकुमार होळकर, प्रणिता खोमणे, बाळासाहेब कामठे आणि मिलिंद कांबळे यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. प्रत्येक वर्षी एका संचालकाला उपाध्यक्षपदी संधी देण्याची भूमिका पूर्वी अजित पवार यांनी मांडली होती. त्यामुळे आता नव्या निवडीकडे उत्सुकता अधिक वाढली आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात सुनेत्रा पवार यांनी कारखान्यास भेट दिल्यानंतर उपाध्यक्षपदाचा निर्णय जाहीर होईल, अशी सभासदांची अपेक्षा होती; मात्र त्या वेळी निर्णय झाला नव्हता.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here