अहिल्यानगर : सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राहुरी येथे शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन, साखर निर्यात निर्बंधाचा निषेध

अहिल्यानगर : सरसकट कर्जमाफी लागू करावी या मागणीसाठी राहुरी येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी मंगळवारी, दि. ९ रोजी चक्का जाम आंदोलन केले. बाजार समिती परिसरात नगर-मनमाड राज्य महामार्गावर प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, संतोष चोळके, सुनील आढाव, विजय तोडमल, गोरक्षनाथ लांबे, किशोर गाडे, सचिन म्हसे, किशोर वराळे, योगेश सोनवणे, संदीप खाडे, गजानन चव्हाण, सचिन पवार यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या -कर्जमाफी योजनेतील किचकट अटी व निकषांमुळे बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप शिंदेसेना शेतकरी सेनेने केला आहे. राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात आली.

शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगला दर असतानाही निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जे ‘राइट ऑफ’च्या नावाखाली माफ होतात, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कठोर अटी लादल्या जातात. हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. यावेळी प्रकाश देठे यांनीही सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करत राहुरीत नगर-मनमाड महामार्गावर ठाण मांडले. येत्या १५ तारखेपर्यंत कर्जमाफीचे नियम शिथिल करून सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर मुंबईतील वर्षा बंगल्यावर जाऊन बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय आंदोलकांनी जाहीर केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here