कोल्हापूर : राज्यात अन्न व औषध विभागाकडून भेसळखोरांविरोधात कारवाई सुरू आहे. पुणे व इतर जिल्ह्यांत ठिकठिकाणी साखर व रंग मिश्रित गुळावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा धसका गूळ उत्पादक शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांनी घेतला आहे. परिणामी राज्यात सध्या पुणे, सांगली, निरा बाजार समितीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून गूळ सौदे बंद आहेत. त्याचा परिणाम कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिसून आला आहे. बुधवारी गुळाची आवक घटल्याने दर वाढला. काही दिवसांपूर्वी ज्या गुळाला प्रतिक्विंटल ३७०० ते ३८०० रुपये दर मिळायचा, त्या गुळाला ४२०० रुपये तर ४२०० रुपये दर असणाऱ्या गुळाला ४८०० रुपये इतका प्रतिक्विंटल दर मिळाला. दरम्यान बाजर समितीमध्ये बुधवारी (दि.१०) गुळाची आवक सुमारे ७० टक्क्यांनी घटली अशी माहिती सूत्रांनी दिली.
बाजार समितीत सध्या एक दिवसाआड निघणाऱ्या गूळ सौद्यात सुमारे १७ गाडी गुळाची आवक होते. बुधवारी केवळ पाच गाडीच आवक झाली. आवक घटल्याने दर वधारला. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४२०० ते ४८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळघरे आता बंद झाली आहेत. शेतकऱ्यांनी गुळ हंगामात गुळ हंगामात उत्पादित केलेला गूळ हळूहळू विक्रीस आणण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे कमी प्रमाणात का असेना गुळ बाजारपेठेत येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने सध्या तरी कारवाई केलेली नाही. मात्र इतर ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईचा धसका व्यापाऱ्यांनी आणि शैतकऱ्यांनी घेतला आहे. सोमवारपासून (दि.८) त्यांनी गूळ उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी या पुढील काळातील सौद्यांविषयी अनिश्चितता आहे.


















