सोलापूर : दक्षिण सोलापूरमधील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजकडील थकीत उसाची बिले मिळावीत या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (१० जून) धर्मवीर संभाजी तलाव (कंबर तलाव) येथे जलसमाधी आंदोलन केले. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही शेतकरी ठाम राहिले. शेतकऱ्यांनी पोलिसांसमोरच तलावात उड्या मारल्या. अग्निशामक दलाने धावाधाव करीत शेतकऱ्यांना तलावातून बाहेर काढले. आम्हाला तत्काळ पैसे देण्याची व्यवस्था करा, अशी विनंती शेतकन्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे लावून धरली. यावर प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने जलदगतीने काम करत आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यासाठी थोडा वेळ द्या तुमचे पैसे वसूल करून देऊ, असा विश्वास जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी व्यक्त केला आहे.
जलसमाधी आंदोलनावेळी पत्रकार भवन चौकात मोठा पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी त्यांना न जुमानता कंबर तलावाकडे धाव घेतली. तलावात शेतकऱ्यांनी पोलिसांसमोरच उड्या मारल्या. त्यांना रोखण्याचा पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांची संख्या आणि आक्रमकतेपुढे पोलिस हतबल झाले. अनेक शेतकरी तलावात उतरले. पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी पाण्यात उतरून शेतकऱ्यांना विनंती केली. तलावाच्या मध्यभागी गेलेल्या शेतकऱ्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. या आंदोलनात पंडित पुजारी (हन्नूर), देविदास खांडेकर (बोरेगाव), गणेश राठोड (चुंगी) हे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आघाडीवर होते.
दरम्यान, साखर आयुक्तांकडून आरआरसी कारवाईसाठी पत्र आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने यासंदर्भातील कायदेशी प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित साखर कारखान्याला यापूर्वी तीन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुढील नोटिसा देण्यासाठी काही कायदेशीर वेळ द्यावा लागणार आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर कारखान्याची मालमता ताब्यात घेऊन लिलाव करण्यात येणार आहे. त्यामधून तातडीने शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करता येतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. २२ जून रोजी जंगम मालमत्ता अटकवून ठेवण्याची नोटीस दिली जाईल. तर ७ जुलै रोजी स्थावर मालमता जप्तीचे आदेश देऊ. २२ जुलै रोजी मालमत्ता विक्रीची उद्घोषणा केली जाईल आणि २९ जुलै रोजी मालमत्ता विक्रीची लेखी नोटीस देण्यात येईल. ५ ऑगस्ट रोजी जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीची घोषणा करू. तर १२ ऑगस्ट रोजी मालमत्ता विक्रीचे प्रमाणपत्र दिले जाईल असे प्रशासनाने सांगितले.


















