पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किसन तांबे यांची गुरुवारी (ता. १२) बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्ताने कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर बारामतीच्या जिराईत भागाला न्याय देण्यात आला आहे. सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर गुरुवारी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत तांबे यांची निवड करण्यात आली. सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी नावाची घोषणा केली.
निवडीसाठी किसन तांबे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी काम पाहिले. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व सचिव कालिदास निकम यांनी प्रक्रियेस सहकार्य केले. याप्रसंगी संचालक राजवर्धन शिंदे, लक्षण गोफणे, सुनील भगत, संग्राम सोरटे, आनंदकुमार होळकर, ऋषिकेश गायकवाड, बाळासाहेब कामथे, शैलेश रासकर आदी उपस्थित होते.


















