छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने अंबाला व ठाकरवाडी येथे गुरुवारी ऊसतोड कामगार कुटुंबांसाठी मोफत आरोग्य शिबिर झाले. या शिबिराला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला व मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर ऊस तोडणी कामगारांना आमदार संजना जाधव यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आला. त्यामुळे या कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी आमदार संजना जाधव म्हणाल्या की, या ओळखपत्रामुळे कामगारांच्या हक्कांचे संरक्षण होईल आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट त्यांच्यापर्यंत पोचवणे सोपे होईल. आयोजित या शिबिराला सरपंच सखाराम भारसागळे, वैद्यकीय अधिकारी धनश्री किरांगे, संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. अप्पासाहेब उगले, उपसरपंच शिवराम मेंगाळ, माजी सरपंच गंगाराम आगिवले, प्रल्हाद आगिवले यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.


















