धाराशिव : खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बाणगंगा (आयान) साखर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या थकीत उसाच्या बिलांचे वितरण सुरू केले आहे. १० जूनपासून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून बिलांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हंगामात जानेवारी महिन्यापासून कारखाना बंद होईपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस बाणगंगा साखर कारखान्याकडे गाळपासाठी दिला होता. हंगाम संपल्यानंतरही उसाची बिले वेळेवर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.
शेतीची कामे, मुलांचे शैक्षणिक खर्च, कर्जाचे हप्ते, घरखर्च तसेच आगामी खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते व कृषी साहित्य खरेदीसाठी पैशांची आवश्यकता होती. ऊसाची देयके रखडल्याने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली होती. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना थकीत ऊसबिल मिळणे अत्यंत गरजेचे होते. कारखाना प्रशासनानेही शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन थकीत देयकांच्या वितरणास प्राधान्य दिले आहे. सर्व ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. उर्वरित देयकेही लवकरात लवकर मिळावीत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. कारखाना प्रशासनानेही सर्व थकीत बिले लवकरच अदा करण्यात येतील, अशी ग्वाही दिली आहे.


















