छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील संत एकनाथ साखर कारखाना करार पद्धतीने चालविणारे सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची साखरसह महसूल विभागाने सील केलेल्या विविध मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.११) साखर आयुक्त विभागाच्या आदेशाने विशेष लेखापरीक्षक विशाल जोगदंड यांच्या पथकाने मालमत्तांचा पंचनामा करून लिलाव करण्यासाठी ताबा घेतला आहे. एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊन घोटाळ्यात गुंतलेले सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे सचिन घायाळ यांच्यावर कर्ज घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून सचिन घायाळ अद्याप फरार आहे.
सचिन घायाळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कामगारांसह शेतकऱ्यांचे ऊस बिल रक्कम देण्यात आली नाही. ऊस गळीत हंगामात तयार केलेली साखर साठवण्यासाठी असलेले दोन गोडाऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नियुक्ती पथक, महसूल अधिकारी तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांनी जप्तीची कारवाई केली होती. शेतकरी व कामगारांना रक्कम अदा करण्यासाठी गुरुवारी विशेष लेखापरीक्षक विशाल जोगदंड यांच्या पथकाने जप्त असलेली मालमत्ता, साखरसाठा ३.५०० क्विंटल, मोलेसेस २.००० टन, ऊस वाहतूक करण्यासाठी असलेले टायर गाडी ४५० नग ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. सगळी मालमत्ता संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या ताब्यात संरक्षणात दिली आहे. पुढील आठवड्यात या मालमत्तांचा लिलाव करून न्यायालयामार्फत कामगारांसह शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात येणार आहे.


















