कोल्हापूर : श्री शाहू कारखान्याच्यावतीने ठिबक सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे होते. यावेळी शाहू साखर कारखान्यामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री छत्रपती शाहू ठिबक सिंचन योजनें’तर्गत शेतकऱ्यांना कर्जमंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. तर मागासवर्गीय समाजातील शेतकऱ्यांना जैविक निविष्ठांचे वितरण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींच्या उच्च शिक्षणासाठीच्या फी माफीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या मुलींच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. लोकप्रिय निर्णयांपेक्षा लोकहिताचे निर्णय घेण्याची परंपरा शाहू कारखान्याने जपली आहे. त्यामुळेच सहकारी साखर कारखानदारीत आदर्श ठरलेल्या या कारखान्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्याचाच वारसा समरजित घाटगे समर्थपणे पुढे नेत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी समरजित घाटगे यांचे भाषण झाले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. संचालक डी. एस. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास वीरेंद्रसिंह घाटगे, अखिलेश घाटगे, अमरसिंह घोरपडे उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here