लातूर :देवणी तालुक्यातील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडने गळीत हंगाम २०२५-२६ मधील एफआरपीच्या अंतिम हप्त्यापोटी प्रतिटन ३१२.१६ रुपये अदा केले आहेत. यापूर्वी कारखान्याने प्रतिटन २,८५० रुपये ऊस बिल दिले होते. त्यानुसार आता शेतकऱ्यांना एकूण प्रतिटन ३१६२.१६ रुपये दर मिळाला आहे. कारखान्याच्यावतीने गुरुवारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. राज्य शासनाच्या १५ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार अंतिम साखर उतारा व ऊसतोड-वाहतूक खर्च विचारात घेऊन एफआरपी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार अंतिम दर जाहीर करण्यात आला आहे.
संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख तसेच अध्यक्षा व कार्यकारी संचालक गौरवी अतुल भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने चांगली कामगिरी साध्य केल्याचे सांगण्यात आले. कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याने ६ लाख ६४ हजार ८ मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप करून ६ लाख ९० हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बी-हेवीसह सरासरी १२.००४ टक्के साखर उतारा मिळाला असून, २ कोटी ५२ हजार युनिट वीज निर्मिती व निर्यात करूनही कारखान्याने आघाडी कायम ठेवली आहे. राज्यातील खाजगी साखर कारखान्यांमध्ये एफआरपीपेक्षा अधिक दर देणाऱ्या कारखान्यांपैकी जागृती शुगरने आपली शेतकरी हिताची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बँक खात्यात जमा झालेली रक्कम तपासून घ्यावी, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे आणि सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.


















