लातूर : साखर उद्योगात राज्यस्तरीय सर्वोत्तम तांत्रिक संचालन व नवीनत्तम कार्यासाठी पुण्यातील वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन (विस्मा)च्या वतीने देण्यात येणारा मानाचा पुरस्कार मांजरा परिवारातील ‘जागृती शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज’ला प्रदान करण्यात आला. पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. ‘जागृती शुगर’चे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, संचालक दिलीप माने, सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी पुरस्कार हा स्वीकारला. कारखान्याने सूक्ष्म नियोजन, पारदर्शकता ठेवून केवळ ऊस गाळप इतक्यावरच न राहता इथेनॉल, वीज, सीबीजी गॅस असे विविध नवनवीन तंत्रज्ञान वापरून प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अधिक उसाला योग्य भाव देण्यासाठी या साखर कारखान्याकडून मोठी मदत झाली आहे, असे सांगण्यात आले.
यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी रामानंद ठोंबरे म्हणाले की, माजी मंत्री व ‘जागृती शुगर’चे संस्थापक दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागृती शुगर’च्या अध्यक्षा व कार्यकारी संचालक गौरवी भोसले-देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १६ वर्षांपासून साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार बजरंग सोनवणे, साखर आयुक्त संजय कोलते, बी. बी. कदम, मुख्य अभियंता अतुल दरेकर, उपअभियंता अक्षय सूर्यवंशी, मुख्य रसायनतज्ज्ञ ज्ञानेश्वर जाधव, गंगाधर जाधव, अभियंता महादेव डोंगरे आदी उपस्थित होते.


















