महाराष्ट्र : २५ हजार पगार असल्यास कर्जमाफी नाही, राज्यातील साखर कामगारांना बसणार फटका

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील २१० कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. या सर्व कारखान्यांकडे सुमारे अडीच लाखांपर्यंत कर्मचारी काम करत आहेत. साखर उद्योगात कायम कर्मचाऱ्याला मासिक किमान तीस हजारपासून पुढे पगार मिळतो. तर, हंगामी कर्मचाऱ्याला हंगामादरम्यान पूर्ण पगार व बिगर हंगामात रिटेन्शनच्या रूपाने निम्मा पगार मिळत असतो. मात्र, राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतून मासिक २५ हजारपेक्षा जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांनाच बसणार आहे. राज्य शासनाने तत्काळ हा नियम बदलून साखर कामगारांना कर्जमाफीचा लाभ द्यावा; अन्यथा बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी दिला आहे.

सद्यस्थितीत राज्यातील अनेक कारखान्यांकडे एक महिन्यापासून दोन-अडीच वर्षांपर्यंत कामगारांचे पगार थकीत आहेत. हा आकडा सुमारे एक हजार कोटी रुपयांवर आहे. साखर उद्योगातील कामगार हा आर्थिकदृष्ट्या भरडला जात आहे. मात्र, राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतून वगळले गेल्याचा फटका राज्यातील सुमारे दीड लाख कामगारांना बसणार आहे. आधीच अनियमित पगारामुळे अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांतील कामगारांना हा मोठा फटका बसणार आहे. बहुतांश साखर कारखान्यांत कायम व कायम हंगामी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनेकजण शेतकरीच आहेत. राज्य शासनाने असा निर्णय घेतल्यामुळे हजारो साखर कामगार शेतकरी असूनही कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. विविध कारणांनी साखर कामगार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला असताना राज्य शासनाच्या निर्णयामुळे संतापाचे वातावरण पसरले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here