ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी मॅके शुगर (Mackay Sugar) सायबर हल्ल्याचा बळी ठरली आहे. 10 जून रोजी झालेल्या या हल्ल्यामुळे कंपनीच्या महत्त्वाच्या कामकाजावर परिणाम झाला असून तिच्या तीनपैकी दोन साखर कारखान्यांचे कामकाज तात्पुरते विस्कळीत झाले आहे. मॅके शुगर ही उत्तर क्वीन्सलँडमधील मॅके परिसरात कार्यरत असून तिला 140 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कंपनी फार्ले, मेरियन आणि रेसकोर्स हे तीन प्रमुख साखर कारखाने चालवते आणि दरवर्षी सुमारे 7 लाख टन कच्च्या साखरेचे उत्पादन करते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सायबर सुरक्षेशी संबंधित घटनेमुळे काही ऑपरेशनल प्रणाली प्रभावित झाल्या आहेत. सध्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, उत्पादन प्रणालींचे संरक्षण आणि व्यवसायाचे सातत्य राखणे यावर भर दिला जात आहे. हा हल्ला ऊस गाळप हंगाम सुरू असताना झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. शेतातील किंवा वाहतुकीत असलेला ऊस अडकून पडण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकरी आणि वाहतूकदारांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेच्या तपासासाठी कंपनीने सायबर सुरक्षा तज्ज्ञांची नियुक्ती केली असून संबंधित सरकारी यंत्रणांनाही माहिती दिली आहे. मात्र, कोणत्या प्रणालींवर हल्ला झाला, कोणती माहिती चोरीला गेली का किंवा औद्योगिक नियंत्रण प्रणाली थेट प्रभावित झाल्या का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.12 जूनपर्यंत कंपनीने फार्ले कारखान्यात मर्यादित स्वरूपात हाताने गाळप प्रक्रिया पुन्हा सुरू केली. मात्र, हा ऊस हल्ल्यापूर्वी कापलेला होता. नवीन ऊस स्वीकारण्याची प्रक्रिया अद्याप पूर्णपणे सुरू करण्यात आलेली नव्हती, कारण ऊस पुरवठा, कापणी आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल प्रणाली अजूनही बंद होत्या.
15 जून रोजी कंपनीने जाहीर केले की ऊस पुरवठा, कापणी आणि कारखाना संचालनाशी संबंधित प्रणाली पूर्ववत करण्यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. सध्या स्टीम ट्रायल सुरू असून अंतिम चाचण्या यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कापणी आणि गाळप प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल.कंपनीने ऊस उत्पादक आणि कापणी पथकांना पुढील सूचना मिळेपर्यंत कापणी सुरू करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच या घटनेचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर पूर्ण कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.तज्ज्ञांच्या मते, शेतात उभा असलेला ऊस जास्त काळ राहिल्यास त्यातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही बाबतीत नुकसान सहन करावे लागू शकते.


















