अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी आदिनाथ झुराळे बिनविरोध

अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन उपाध्यक्ष पदावर आदिनाथ निवृत्ती झुराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणूक अधिकारी प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहिल्यानगर संजय गोंदे यांचे अध्यक्षतेखाली कारखान्याच्या भास्करराव गलांडे पाटील सभागृहात मंगळवारी (ता. १६) संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार तथा कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. भानुदास मुरकुटे यांचेसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

उपाध्यक्ष पदासाठी आदिनाथ झुराळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. हिम्मतराव धुमाळ यांचे सूचनेस सोपानराव राऊत यांनी अनुमोदन दिले. निवडणूक कामी प्रादेशिक सह संचालक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक उमेश कुलकर्णी व सहकार अधिकारी विजय खेमनर यांनी निवडणूक अधिकारी यांना सहाय्य केले. यावेळी मुरकुटे म्हणाले की, उपाध्यक्ष पद हे दरवर्षी बदलण्यात येईल, असा लोकसेवा विकास आघाडीचा निर्णय होता. त्यानुसार आदिक यांनी वर्षभर अत्यंत जबाबदारीने काम केले, असेच काम नूतन झुराळे हेही करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here