बेळगाव : कर्नाटकातील प्रमुख कृषी जिल्हा अशी ओळख असलेल्या बेळगावमध्ये पीक पद्धतीत मोठे बदल होत आहेत. एका बाजूला शेतकरी ऊस लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला तंबाखू लागवड कमी करून अधिक नफ्याच्या हळद पिकाकडे वळत आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऊस आणि हळदीला मिळणारा चांगला दर व बाजारातील मागणी यामुळे शेतकऱ्यांच्या निर्णयांमध्ये बदल होत आहे.
ऊस लागवडीत सातत्याने वाढ…
बेळगाव जिल्ह्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र गेल्या चार वर्षांत लक्षणीय वाढले आहे. 2022-23 मध्ये 2.60 लाख हेक्टर असलेले ऊस क्षेत्र 2023-24 मध्ये 2.80 लाख हेक्टर, 2024-25 मध्ये 2.93 लाख हेक्टर आणि 2025-26 मध्ये 3 लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. 2026-27 हंगामात हे क्षेत्र 3 लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कर्नाटकातील एकूण ऊस क्षेत्रापैकी सुमारे 44 टक्के क्षेत्र एकट्या बेळगाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगासाठी हा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
साखर आणि इथेनॉल उद्योगामुळे उसाला कायम मागणी…
उसदरावरून साखर कारखाने आणि शेतकऱ्यांमध्ये वेळोवेळी वाद होत असले, तरी शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देत आहेत. कारण ऊस पिकात अपयशाचा धोका तुलनेने कमी असतो, खोडवा पिकाचा लाभ मिळतो आणि साखर तसेच इथेनॉल उद्योगाकडून सातत्याने मागणी असते.जिल्ह्यात 28 साखर कारखाने कार्यरत असून चिकोडी, अथणी, गोकाक आणि यरगट्टी भागात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. अनेक शेतकरी अतिरिक्त उत्पन्नासाठी ऊसासोबत कडधान्ये आणि भाजीपाला यांची आंतरपीक पद्धतीही अवलंबत आहेत.कृषी विभागाचे संयुक्त संचालक एच. डी. कोलेकर यांनी सांगितले की, आंतरपीक पद्धतीमुळे ऊस क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे.
हळद बनतेय फायदेशीर पर्याय…
ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असले तरी हळदीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. 2024-25 मध्ये बेळगाव जिल्ह्यात 4,180.88 हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली असून त्यातून 62,713.2 मेट्रिक टन उत्पादन मिळाले. हळदीला सध्या जवळपास 15,000 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना उसापेक्षाही अधिक नफा मिळत आहे. रायबाग तालुका हळद उत्पादनात आघाडीवर असून येथे 1,603.41 हेक्टर क्षेत्रातून 24,051.15 मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. अथणी आणि मुदलगी भागातही हळदीचे क्षेत्र वाढत आहे.उद्यान विभागाचे संयुक्त संचालक महांतेश मुरगोड यांनी सांगितले की, हळद हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन बनले आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत तिचे योगदान वाढत आहे.
तंबाखू लागवडीत मोठी घट…
दुसरीकडे, तंबाखू लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. 2023 मध्ये सुमारे 8,400 हेक्टर क्षेत्रावर तंबाखू लागवड होत होती, ती आता 4,800 हेक्टरपेक्षाही कमी झाली आहे. कृषी विभागाच्या मते, तंबाखूच्या आरोग्यावरील दुष्परिणामांबाबत राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमांमुळे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहेत. निपाणी, चिकोडी आणि हुक्केरी या पारंपरिक तंबाखू उत्पादक भागांतील शेतकरी आता सोयाबीन, हरभरा आणि गहू यांसारख्या पिकांची निवड करत आहेत.अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार जवळपास 80 टक्के तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांकडे वाटचाल सुरू केली आहे.
ऊस आणि हळद ठरत आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार
तज्ज्ञांच्या मते, साखर आणि इथेनॉल उद्योगामुळे ऊसाला कायम बाजारपेठ उपलब्ध आहे, तर हळदीला मिळणाऱ्या उच्च दरांमुळे ती शेतकऱ्यांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात बेळगाव जिल्ह्यात ऊस आणि हळद ही दोन्ही पिके ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रमुख आधारस्तंभ ठरण्याची शक्यता आहे.


















