छत्रपती संभाजीनगर :ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार आणि वाहतूकदारांची थकीत बिले आठ दिवसांत न दिल्यास गंगापूर साखर कारखान्याच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. यासंदर्भात जय हिंद शुगर मिल्स व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. मागील तीन वर्षांपासून हा कारखाना जय हिंद शुगर मिल्स चालवत आहे. यंदा कारखान्यात पावणेदोन लाख साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून चार महिन्यांपूर्वीच गळीत हंगाम संपला आहे; मात्र अद्याप थकीत रक्कम मिळालेली नाही.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशांची तीव्र गरज आहे. त्यातच लांबलेला पावसाळा आणि शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ऊस बिले कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजर लागल्या आहेत. त्यामुळे कारखाना प्रशासनाने त्वरित बिले न दिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके धामोरीकर, संकेत महेराळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.


















