बीड : पावसाला अद्याप सुरवात न झाल्याने आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टर ऊस पिक धोक्यात आले आहे. विशेषतः शिरूर कासार तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिक धोक्यात आले आहे. ऊस, खोडवा ऊस तसेच पूर्व हंगामातील लागवडीला पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस करपू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
विविध गावांमध्ये विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे नियोजित अंतराने पाणी देता येत नसल्याने उसाची वाढ खुंटत आहे. अनेक ठिकाणी पाने पिवळी पडून वाळू लागली असून कांड्यांची जाडी आणि वाढही कमी होत आहे. खोडवा उसावर या परिस्थितीचा अधिक परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. नदीकाठावर विहीर असती तरी यंदा पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याअभावी ऊस पिक करपून गेल्याने केलेला खर्च सुद्धा निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहे.


















