अहिल्यानगर : हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गौरी शुगर अॅड डिस्टिलरीज प्रा. लि. येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मिल रोलर पूजन समारंभाचा उत्साहात प्रारंभ केला. ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभात संचालक ओमराजे बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आगामी गळीत हंगामाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना ओमराजे बोत्रे-पाटील यांनी शेतकरी, कामगार आणि उद्योग यांच्यातील समन्वयाच्या बळावर ओंकार शुगर ग्रुपने साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरीहिताला प्राधान्य देत आगामी गळीत हंगाम अधिक यशस्वी करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव म्हणाले, मिल रोलरपूजनामुळे गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली असून वेळेवर ऊसगाळप आणि उद्योगाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कारखाना कटिबद्ध आहे.


















