सोलापूर : साखर कारखान्याकडे ऊस बिलाचा पाठपुरावा करून थकलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या!

सोलापूर : सुमारे ५० टन ऊस साखर कारखान्याला पुरवठा करूनही पैसे मिळाले नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. रामचंद्र आप्पाशा कळके (मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रशासनाने हा दावा फेटाळला. संबंधित शेतकऱ्याने कौटुंबिक कारणास्तव आत्महत्या केली असून, ऊस बिलाशी या आत्महत्येचा संबंध नाही, असे सांगण्यात आले. गुरुवारी कळके यांनी विष प्राशन केले होते, मात्र याबाबतची पोलिसांत नोंद नाही, अशी माहिती देण्यात आली.

याबाबत माहिती अशी, सुस्ती येथील रामचंद्र कळके यांनी दि. १८ रोजी, गुरुवारी रात्री १० वाजता शेतात फवारणीचे कीटकनाशक प्राशन केले. ते बेशुद्ध पडल्याने त्यांना सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवसांनंतर रविवारी शुद्धीवर आल्यानंतर कळके यांनी पत्रकारांना ५० टन उसाचे बिल अद्यापपर्यंत मिळाले नाही म्हणून औषध घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी ५० टन ऊस पुरवठा केला, त्याचे बिल अद्याप मिळाले नाही. त्यामुळे आत्महत्या करावी लागली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले की, रामचंद्र कळके यांच्या आत्महत्येची माहिती मिळाली. मी मुस्ती गावातील नागरिकांशी संवाद साधला, माहिती घेतली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण कौटुंबिक कलह असू शकते. अधिक माहिती मिळाल्यावर सविस्तर कारण कळेल. गोकुळ शुगर शेतकरी संघर्ष समितीचे नेते अॅड. अमोल पाटील यांनी मात्र, वेळेत पैसे मिळाले असते तर ही आत्महत्या टळली असती, अशी प्रतिक्रिया दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here