कोल्हापूर : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शनिवारी भेट घेतली. यावेळी नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध आणि सिंचन संस्था, स्पिनिंग मिल्स, सहकारी गृहनिर्माण संस्थांना कर्जपुरवठा करण्यास परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली. फेडरेशनचे निपुण कोरे यांनी परवानगी दिल्यास सहकारी क्षेत्राच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतील, असे सांगितले. पीएमईजीपी योजनेंतर्गत कर्जमर्यादा ५० लाखांवरून १ कोटी रुपये करावी, अशी मागणी केली. त्यासह बँकांच्या संचालकांच्या कालमर्यादेबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंतीही त्यांच्याकडे केली.
या भेटीत ‘आरबीआय’च्या नव्या शाखांसाठी प्रतिशाखा दोन कोटी रुपये हेडरूम कॅपिटल अटींवर पुनर्विचार करावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली. शासकीय विश्रामगृहावर असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले की, पीएमसी आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या विलीनीकरणानंतर लागू असलेल्या प्रोव्हिजनिंगच्या अटींवर पुनर्विचार करून पूर्वी केलेल्या प्रोव्हिजनिंगला रिव्हर्सलची परवानगी मिळण्याची गरज आहे. त्यामुळे बँकांवरील आर्थिक भार कमी होऊन नफा वाढेल. आरबीआयच्या नव्या शाखांसाठी प्रतिशाखा दोन कोटी रुपये हेडरूम कॅपिटल अटींवर पुनर्विचार करावा. बँकिंग रेग्युलेशन कायदा आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील विसंगती दूर करण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करावा, अशी मागणीही करण्यात आली.


















