सांगली: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या साखर पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त ईश्वरपूरमध्ये रविवारी पक्के राजकीय विरोधक एकत्र आल्याचे दिसले. ते एकाच कट्ट्यावर बसून खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करत होते. त्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले (सहकार पॅनेल) यांच्यासाठी सर्वांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. भोसले यांच्या पॅनेलला विजयी करण्यासाठी या सर्व कट्टर विरोधकांनी एकत्र येत आज मतदानाच्या दिवसभर पारावर बसून राजकीय जबाबदारी पार पाडली. चर्चेमध्ये ईश्वरपूरचे नगराध्यक्ष तथा जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आनंदराव मलगुंडे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख नगरसेवक तथा आनंदराव पवार, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे वाळवा तालुकाध्यक्ष केदार पाटील, नगरसेवक (अजित पवार गट) अजित पाटील व राजवर्धन पाटील, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील सहभागी झाल्याचे दिसत होते.
पालिका निवडणुकीत हे सर्वजण एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे होते. नगराध्यक्ष मलगुंडे यांना प्रशासकीय कामांवरून आक्रमकपणे जाब विचारणारे आनंदराव पवार मलगुंडे यांच्याशी हसतखेळत गप्पा मारत होते. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत जे नेते एकमेकांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी जिद्दीला पेटले होते, तेच गटतट आणि पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून गप्पा मारताना दिसले. राजकारणाच्या पलीकडचे हे मैत्रीचे चित्र ईश्वरपुरात चर्चेचा विषय ठरले. एरवी एकमेकांना हरवण्यासाठी ईर्ष्या बाळगणारे हे नेते एकाच झाडाखाली दिवसभर ठाण मांडून बसले होते. कारखान्याची निवडणूक संपताच, हे नेते पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील अशी शक्यता आहे.


















