कोल्हापूर : राज्यात बहुतांश भागातील तापमान ४० अंश सेल्सिअस तापमान किंवा त्यापेक्षाही जास्त हवेतील कोरडेपणा आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जमिनीतील तसेच ऊस पानातील ओलाव्यात झपाट्याने घट होत आहे. जमिनीतून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मार्च ते जून या कालावधीत वर्षभरातील ४५ ते ५० टक्के वाष्पीभवन होते. दिवसाचा वाढलेला कालावधी आणि दिवस व रात्रीच्या तापमानातील कमी असणारा फरक पिकाच्या वाढीवर परिणाम करतो. हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे ऊस पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत आहे. वाढत असलेले तापमान, बाष्पीभवनाचा तसेच उत्सर्जनाचा वाढणारा वेग, पीकवाढीची जोमदार अवस्था, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि पिकावर पडत असलेला ताण पाहता योग्य व्यवस्थापन गरजेचे असल्याचे मत पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कोटगिरे, डॉ. ए. डी. कडलग, जी. ई. आत्रे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात सुरू हंगामात लागण केलेल्या तसेच खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटत आहे. पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटली आहे. कांड्याची लांबी व जाडी कमी होते. या ऊस उत्पादनात घट होवू नये यासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लांबसरी, एक आड एक सरी किंवा जोडओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा, प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट व दांड स्वच्छ ठेवावे, मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊनच उसाचे क्षेत्र ठरवावे, लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावे, सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे १ ते १.५, २ ते २.५ आणि २.५ ते ३ लि. सेकंद प्रवाह विभागून द्यावा, शक्य तेथे ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा पद्धतीचा अवलंब करावा, रासायनिक खते ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत. पिकाची खालची वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पीक नेहमी तण विरहित ठेवावे म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्यात तण वाटेकरी होणार नाही आणि दिलेल्या पाण्याचा पुरेपूर उपयोग होईल. उसाला ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कायटोसान, सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर करावा. सध्याच्या परिस्थितीत काणी व गवती वाढ या रोगांचा तसेच खोडकीड, कांडी कीड, वाळवी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढतो याकडे लक्ष देण्याचे आवाहन शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.


















