नवी दिल्ली : जागतिक स्तरावर तेल संकटाच्या चर्चांदरम्यान आता साखर बाजारातही मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. कमकुवत मान्सून आणि इथेनॉलची वाढती मागणी यामुळे भारतातील ऊस पिकावर संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते, ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर उत्पादन कमी होऊ शकते आणि त्यामुळे जागतिक बाजारात साखरेच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अपेक्षेपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस लागवड आणि उत्पादनावर होऊ शकतो. दुसरीकडे, पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉलची वाढती गरज असल्याने ऊसाचा वापरही सातत्याने वाढत आहे. या दोन्ही कारणांमुळे साखर उत्पादनावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.
भारत हा जगातील प्रमुख साखर उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक आहे. देशांतर्गत गरजा लक्षात घेता केंद्र सरकार पुढील तीन वर्षे साखर निर्यातीबाबत कठोर भूमिका घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये साखरेचा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढू शकतात.उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, चालू हंगामात देशात सुमारे 309.5 लाख टन साखर उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता हे उत्पादन घटून सुमारे 279 लाख टनांपर्यंत मर्यादित राहू शकते. देशातील वार्षिक साखर वापर सुमारे 285 लाख टन असल्याने आगामी हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा साठा केवळ 35 लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. हा साठा गेल्या 30 वर्षांतील सर्वात कमी स्तर मानला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, 2015 मध्येही एल निनोमुळे ऊस लागवडीवर परिणाम झाला होता. त्यानंतर 2016-17 मध्ये भारताला साखर आयात करावी लागली होती. यंदाही हवामानात सुधारणा झाली नाही आणि इथेनॉलची मागणी अशीच वाढत राहिली, तर आगामी काळात साखर उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. सध्या ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि संपूर्ण साखर उद्योगाचे लक्ष मान्सूनची प्रगती आणि सरकारच्या निर्यात धोरणाकडे लागले आहे. कारण याच दोन घटकांवर भविष्यातील साखरेची उपलब्धता आणि दर अवलंबून राहणार आहेत.


















