महाराष्ट्र : ऊस वाहतुकदारांच्या नावावर कारखानदारांनी परस्पर उचलले कर्ज, संघटनेकडून अन्नत्याग आंदोलन सुरू

कोल्हापूर : राज्यातील सुमारे ९० हजार ऊस वाहतूकदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेने सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. काही साखर कारखानदारांनी ऊसतोडणी व वाहतुकदारांची फसवणूक करून, कागदपत्रांचा गैरवापर करून मुद्रा कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बँकांचे काही अधिकारी व कारखाना प्रशासनाचे संगनमत यास कारणीभूत ठरले आहे असा आरोप त्यांनी केला.

काही खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी ऊस वाहतूकदारांकडून वाहतूक, तोडणी करारावेळी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप संघटनेने केला. यामुळे अनेक ऊस वाहतुकदारांचे सिबिल रेकॉर्ड खराब झाले आहे. करारासाठी वाहतुकदारांकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून राज्यातील सुमारे १५० सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला. या प्रकरणी कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेने सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

ChiniMandi WhatsApp Channel

या प्रकरणात नामांकित बँकांच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कारखाना प्रशासनाने ऊस वाहतुकदारांची फसवणूक केल्याचा आरोपही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी केला. शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी या प्रश्नावर तातडीने निर्णय न घेतल्यास यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना संघटनेने निवेदन दिले. यामध्ये मुकादमांकडून फसवणूक झाल्यास तातडीने गुन्हे दाखल करा, मुकादमास अटक झाल्यानंतर ७० टक्के रक्कम वसूल करण्यात यावी, राज्यातील ऊस वाहतूकदारांना शासनाने कर्जमाफीत सामील करून घ्यावे, ऊस वाहतूकदारांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागण्या केल्या आहेत. संबंधित बँक अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here