नवी दिल्ली : देशात सध्या सरासरीपेक्षा सुमारे ४० टक्के कमी पावसाची नोंद होत आहे. मात्र, संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जिल्हास्तरावर आकस्मिक (कंटिजन्सी) कृती आराखडे तयार ठेवले आहेत. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे कृषी आयुक्त पी. के. सिंह यांनी सांगितले की, सिंचन सुविधांमध्ये झालेली वाढ आणि पुरेसा अन्नधान्य साठा यामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.फिक्की (FICCI) आयोजित ‘इंडिया इनोव्हेटिव्ह क्रॉप न्यूट्रिशन कॉन्क्लेव्ह २०२६’ दरम्यान ‘एएनआय’शी बोलताना सिंह यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभाग (IMD) कडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्व जिल्ह्यांसाठी कंटिजन्सी योजना तयार करण्यात आल्या आहेत.
२०१५ च्या एल-नीनोच्या तुलनेत परिस्थिती अधिक चांगली…
पी. के. सिंह यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती काही प्रमाणात २०१५ मधील एल-नीनो वर्षासारखी असली तरी त्या काळाच्या तुलनेत देशाची सिंचन क्षमता आता लक्षणीयरीत्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांत सिंचन पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्याने कृषी क्षेत्र अधिक सक्षम झाले आहे.कृषी आयुक्तांनी सांगितले की, देशाकडे तांदूळ आणि गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही संभाव्य पुरवठा संकटाचा सामना करता येईल.ते म्हणाले, तांदूळ आणि गव्हाचा साठा समाधानकारक स्थितीत आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता निर्माण झाल्यास सरकार आवश्यक ती पावले उचलेल. गरज पडल्यास आयातीचाही पर्याय वापरण्यात येईल.
पाऊस कमी झाल्यास शेतकऱ्यांचा कडधान्यांकडे कल…
पी. के. सिंह यांनी सांगितले की, जेव्हा मान्सून उशिरा येतो किंवा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते, तेव्हा शेतकरी कमी कालावधीत तयार होणाऱ्या आणि कमी पाण्याची गरज असलेल्या कडधान्य पिकांकडे वळतात. त्यांच्या मते, हा एक सकारात्मक बदल आहे. कारण अशा पिकांमुळे कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळू शकते आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होते. कृषी आयुक्तांनी सांगितले की, सध्या देशात ४० टक्के पावसाची तूट आहे. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. हवामानातील बदलांनुसार आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी सरकार आणि संबंधित यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत.


















