सातारा : महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने विरोधी संस्थापक पॅनेलचा २१ विरुद्ध शून्य असा धुव्वा उडवत विजयाची हॅट्ट्रिक साधली. पहिल्या फेरीपासून सहकार पॅनेलची घोडदौड कायम ठेवल्याने अंतिम फेरीअखेर ‘सहकार’ने सुमारे १४ हजार ७०० मताधिक्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांवर विजय मिळवला. २०२१ च्या निवडणुकीत सहकार पॅनेलने ११ हजारांचे मताधिक्य मिळवले होते. यावेळी त्यात तीन हजारांची भर पडल्याचे दिसून आले. विरोधी संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांना १० ते ११ हजार मतांवरच समाधान मानावे लागले.
वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी आठला मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत एक ते ७७ मतदान केंद्रांवरील सुमारे १७ हजार ५०० मतांची मोजणी झाली. त्यात सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी सुमारे साडेसात हजारांची विजयाची निर्णायक आघाडी घेतली. दुपारनंतर दुसऱ्या फेरीची मोजणी झाली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. त्यातही मताधिक्य कायम ठेवत ‘सहकार’च्या उमेदवारांनी त्यांच्या विजयाची घोडदौड १४ हजार ७०० मताधिक्याने कायम राखली. सर्वच २१ जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवला.
काही ठिकाणी भाकरी फिरवायला हवी होती…
मतदान प्रक्रियेदरम्यान एका सभासदाने मतपेटीत टाकलेली चिड्डी मतमोजणीवेळी सापडली. ती मतमोजणी प्रतिनिधीने प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर त्याची चांगलीच चर्चा रंगली. त्यात क-हाड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले आणि कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले होते. मात्र, काही गटांमध्ये नव्या आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले होते. कारखाना उत्कृष्ट चालवला. मात्र, काही ठिकाणी भाकरी फिरवायला हवी होती, असा आशय त्यात होता. ती चिठ्ठीही समाज माध्यमांवर व्हायरल झाली. निवडणूक विभागाने त्या चिठ्ठीबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर ही चिड्डी नेमकी कोणी दिली, त्याची चर्चा सुरू होती.
बाळासाहेब जगतापांना सर्वाधिक मताधिक्य
सत्ताधारी सहकार पॅनेलच्या इतर मागास प्रवर्ग गटातील उमेदवार बाळासाहेब जगताप यांना सर्वाधिक २५ हजार १०, तर संस्थापक पॅनेलच्या नेत्या अर्चना मोहिते यांना विरोधी आघाडीत सर्वाधिक ११ हजार ८९६ मते मिळाली. महिला राखीव गटातील सुनीता शेवाळे यांना २१ हजार ८७४, तर संस्थापक पॅनेलमध्ये गट क्रमांक एकमधील दुर्योधन खबाले यांना नऊ हजार ४३७ अशी सर्वात कमी मते मिळाली. इतर मागासमधील बाळासाहेब जगताप सर्वाधिक १४ हजार ७३४ मतांनी विजयी झाले.


















